जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला गोव्यातून परतताना पकडले
जळगाव (प्रतिनिधी) : हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. दिपेश कमलेश रुपाणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकूण १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.


दोन गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग
रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७/२०२५ आणि ८८/२०२५ अन्वये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी पहिल्या गुन्ह्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, १२०(ब), ४६५, ४६८ आणि ४७१ अन्वये, तर दुसऱ्या गुन्ह्यात कलम ४२० अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दिपेश रुपाणी याने तक्रारदारांचा विश्वास संपादन करून हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या रकमेची फसवणूक केली. याशिवाय, इतर अनेक नागरिकांचीही विविध पद्धतीने फसवणूक केल्याचा संशय आहे.
राजस्थान, नागपूरसह विविध ठिकाणी शोधमोहीम
सदर आरोपी मागील सुमारे वर्षभरापासून फरार होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचा राजस्थान, जोधपूर, अमरावती, नागपूर, खामगाव आणि बडनेरा परिसरात शोध घेण्यात येत होता. मात्र, आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढण्यात अडचणी येत होत्या. तो मोबाईल क्रमांक आणि सिमकार्डही बदलत असल्याचे तपासात समोर आले.
दरम्यान, आरोपी गोवा राज्यात गेल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी सीएसएमटी ते नागपूर असा प्रवास दूरांतो एक्स्प्रेसने करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर रवाना झाले.
बडनेरा रेल्वे स्थानकावर थरारक पाठलाग
दूरांतो एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर अवघ्या पाच मिनिटांसाठी थांबत असल्याने आरोपीला तेथे पकडण्याची संधी कमी होती. त्यामुळे पोलिसांनी पुढील स्थानकांवर लक्ष केंद्रित केले. बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या पथकाने तत्परतेने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतमकुमार पाटील, समाधान पाटील, घनश्याम पवार आणि विजय शिरसाठ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आवाहन
हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाली असल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








