महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील ८९ खेळाडूंचा सहभाग
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चाचणी १५ व १६ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या निवड चाचणीत महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण ८९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या निवड चाचणीदरम्यान सहभागी खेळाडूंनी बॅडमिंटनमधील आपले कौशल्य, चपळता, अचूकता आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.


राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.वैद्यकीय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करावी, या दृष्टीने अशा निवड चाचण्यांना विशेष महत्त्व आहे.
क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मदत होते. विविध महाविद्यालयांतील खेळाडूंना एकत्र येऊन आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी या निवड चाचणीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या निवड चाचणीचे उद्घाटन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टवर फित कापून करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षक विशाल काळे, दिलीप गायकवाड, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे, पंच विनय पाटील, पराग पाटील, नावेद खान,प्रशिक जितेधोेर, शेख आवेज शेख आमीन, रोहन पाटील, क्रीडा सचिव पियूष चिंचकर, वैभव लटपटे, जनरल सेक्रेटरी उत्कर्ष भोसले उपस्थित होते. महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या बॅडमिंटन खेळाला प्रोत्साहन मिळत असून, गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.








