जळगाव : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथील बीसीए,एमबीए, एचएचएम आणि एमसीए विभागाच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर्स स्पॉटलाईट के२६” हा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.


याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शनात संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी नवनिर्वाचित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या संधी, करिअरचे नियोजन आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या या नवीन प्रवासात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नवीन विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर्स स्पॉटलाईट” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंट्रोडक्शन, डिबेट, टंग ट्विस्टर आणि जज क्वेश्चन अशा एकूण चार फेर्यांच्या (१०० गुण) आधारे मूल्यांकन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य , गायन, आणि रॅप सांग यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली. या वर्षी मिस फ्रेशर रोशनी सरोदे या विद्यार्थिनीने बहुमान मिळवला व मिस्टर फ्रेशर प्रितेश ठाकुर हा विद्यार्थी ठरला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी महाजन हिने अतिशय उत्कृष्टपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन, बक्षीस वितरण, भोजन आस्वाद आणि डी. जे. डान्स पार्टीने कार्यक्रमाची सांगता झाली.









