नृत्य, गायन, रॅप अन् विविध स्पर्धांतून विद्यार्थिनींनीच्या कलागुणांना मिळाला वाव
जळगाव : डॉ. वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध मनोरंजक स्पर्धा, नृत्य, गायन आणि रॅप सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.


कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ निलीमा वारके यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करतांना त्यांनी नवागत विद्यार्थिनींचे महाविद्यालयात स्वागत करून महाविद्यालयीन जीवनात शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सुप्त कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छांमधून अधोरेखित केले.
प्रमुख आकर्षण असलेला ‘द फ्रेशर स्पॉटलाइट’ स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात परिचय, वादविवाद, टंग ट्विस्टर आणि परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे अशा चार फेर्यांमधून ही स्पर्धा घेण्यात आली. या फेर्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वास यांचे मूल्यमापन करण्यात आले.स्पर्धेसोबतच विद्यार्थिनींनी नृत्य, गायन आणि रॅप सादर करून कार्यक्रमात उत्साहाची भर घातली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नव्या विद्यार्थिनींना एकमेकांशी परिचित होण्याची, आपली कला सादर करण्याची आणि महाविद्यालयीन जीवनाची आनंददायी सुरुवात करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली.यंदाच्या ‘मिस फ्रेशर’ स्पर्धेत प्रथम वर्षातून हर्षदा महाजन हिने, तर द्वितीय वर्षातून झिया शेख हिने बहुमान पटकावला.
विजेत्या विद्यार्थिनींचे उपस्थितांनी अभिनंदन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबिया देशमुख हिने प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या अखेरीस पारितोषिक वितरण, आभारप्रदर्शन आणि भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. त्यानंतर आयोजित डी.जे. डान्स पार्टीमध्ये विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. आनंद, मैत्री आणि नव्या आठवणींची शिदोरी देणार्या या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.









