तीन आरोपींना अटक; ४० किलो कापूस आणि चोरीसाठी वापरलेली मारुती सुझुकी ईको गाडीसह २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील शिंगोळा गावातील शेतातून कापूस चोरी करणाऱ्या तीन आरोपींना फत्तेपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा ४० किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी ईको गाडी असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


शिंगोळा येथील शेतकरी सदानंद कैलास जोशी (वय २५, व्यवसाय शेती) यांच्या शेतातून ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अंदाजे १ ते १.३० वाजेच्या सुमारास सुमारे दीड क्विंटल कापूस चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये १० ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पाचोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.
या तपासादरम्यान सैयद सोहेल एजाज (वय २३), सय्यद अनस महेमूद (वय १९) आणि शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर (वय २७) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा कापूस तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली.
जप्त मुद्देमाल
- ४० किलो कापूस — अंदाजे ४,००० रुपये
- मारुती सुझुकी ईको गाडी (क्रमांक MH 20 FY 3450) — अंदाजे २ लाख ५० हजार रुपये
एकूण जप्त मुद्देमाल : २ लाख ५४ हजार रुपये.
या कारवाईत फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









