फत्तेपूर, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील शेंगोळा शिवारात शेतातील कापूस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात तीन जणांनी शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कापूस चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेंगोळा शिवारातील गट क्रमांक ७७ मधील शेतातून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० ते १० ऑक्टोबर रोजी पहाटे २.२२ वाजेच्या दरम्यान कापूस चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अज्ञात तीन आरोपींनी शेतातील अंदाजे एक ते दीड क्विंटल कापूस, ज्याची किंमत सुमारे १० ते १२ हजार रुपये आहे, तो शेतकऱ्याच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने वाहनात टाकून चोरून नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील तीनही संशयित आरोपी अद्याप अज्ञात असून, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर ममराज राठोड करीत आहेत.
शेतातील पिकांची चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.









