श्याम पाटील व पत्नी सपना यांचा मृत्यू; आत्महत्या की घातपात, तपासातून उलगडणार गूढ
अमळनेर (प्रतिनिधी) :- तापी नदीत पायांना लोखंडी साखळी बांधून त्याला कुलूप लावलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्याम हरी पाटील (वय २८, मूळ रा. पाडळसरे, ता. अमळनेर, हल्ली मुक्काम उत्राण, ता. एरंडोल) आणि त्याची पत्नी सपना (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील तापी नदीत हे दोघे मृतावस्थेत आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तापी नदीत दोन मृतदेह तरंगत असल्याची माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सचिन कापडणीस व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह नदीबाहेर काढले. घटनास्थळी पंचनामा करताना श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय लोखंडी साखळीने एकत्र बांधलेला असून, त्याला मोठे कुलूप लावलेले असल्याचे आढळून आले. या संशयास्पद परिस्थितीमुळे घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.
श्याम पाटील आणि त्याचा परिवार काही वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने पाडळसरे येथून उत्राण येथे स्थलांतरित झाला होता. श्याम शेतीची कामे तसेच ट्रॅक्टर चालवून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, उत्राण येथे आपल्या बहिणीकडे राहणाऱ्या सपनाशी त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी मागील वर्षी मे महिन्यात प्रेमविवाह केल्याचे सांगितले जात आहे.
घटनेच्या तीन ते चार दिवसांपूर्वी हे दाम्पत्य बाहेरगावी गेले होते. त्यानंतर अचानक दोघांचे मृतदेह तापी नदीत आढळल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. दोघांनी आत्महत्या केली की हा घातपात आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पायांना साखळी बांधून कुलूप लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
श्यामच्या वडिलांचे निधन झाले असून, त्याची आई आणि लहान भाऊ पाडळसरे येथे राहतात. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.





