भुसावळ ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी वेदांत निलेश पाटील याने बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची शानदार छाप उमटवत अंडर-१४ मुलांच्या गटात जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आगामी विभागीय स्तरावरील आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. काशिनाथ पालोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील विविध शाळांमधून खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंडर-१४ मुलांच्या गटात स्कुलच्या वेदांतने नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करीत एकूण सात डावांपैकी वेदांतने तब्बल ६.५ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळविले.
प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक चालीचा अचूक अंदाज घेत शांतपणे आणि रणनीतीच्या जोरावर त्याने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्याच्या या विजयामुळे डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल भुसावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
वेदांतच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. सौ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील,डॉ. अनीकेत पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी वेदांतचे अभिनंदन केले. तसेच नाशिक येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.









