गोदावरी आयएमआर आयोजित अभियांत्रिकीच्या मैदानावर रंगला फुटबॉलचा थरार
जळगाव ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभाग आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा (पुरुष व महिला) गोदावरी संस्थेच्या गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (जीआयएमआर), जळगाव आयोजित गोदावरी अभियांत्रिकीच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ८ वा स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वराके यांच्या हस्ते श्रीफळ फोडत तसेच फुटबॉल किक देत करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी खेळाडूंशी संवाद साधताना डॉ. वराके यांनी आजच्या ‘जेन झी’ पिढीने मोबाइलच्या आभासी दुनियेत अधिक वेळ न घालवता मैदानाशी नाते जोडण्याचे आवाहन केले.
खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघ भावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारत-ब्राझील सामन्याचे उदाहरण देत फुटबॉलमधील कौशल्य, रणनीती आणि संघभावनेचे महत्त्व खेळाडूंना पटवून दिले.या स्पर्धेत जळगाव विभागातील विविध महाविद्यालयांच्या पुरुष व महिला फुटबॉल संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पुरुष गटात एम. जे. कॉलेजने विजेतेपद पटकावले, तर पी. ओ. नहाटा महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात डॉ. जी. डी. बेंडाळे कॉलेजने प्रथम क्रमांक, एम. जे. कॉलेजने द्वितीय क्रमांक, तर गोदावरी आयएमआर महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. उद्घाटनप्रसंगी विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, प्राध्यापक, कर्मचारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. चंद्रकांत डोंगरे यांनी केले. यावेळी जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. उमेश पाटील, डॉ. संजय चौधरी, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. अनिता कोल्हे, डॉ. चांद खान, प्रा. अख्तर खान, प्रा. आसिफ खान, डॉ. नीलिमा पाटील, प्रा. हिमाली बोरोले, प्रा. अमर हटकर, प्रा. सोनवणे आदी उपस्थित होते.स्पर्धेत पंच म्हणून श्री. असलम अली व श्री. पंकज तिवारी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन प्रा. चंद्रकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रशांत बाहेकर, श्री. दर्शन रोटे, श्री. ललित किरंगे व श्री. प्रफुल्ल भोळे यांनी केले.









