पाण्याखाली झाडांमध्ये अडकलेल्या अरुण कोळी यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले; रबर बोटीसह राबविलेल्या शोधमोहीमेला यश


जळगाव, ( प्रतिनिधी ) :- मौजे कळगाव गावाजवळील वाघूर नदीत बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेले ६० वर्षीय अरुण माधव कोळी हे पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून नदीत पडल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर गावकरी तसेच अग्निशमन विभागाकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर सुमारे २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाच्या पथकाला अरुण कोळी यांचा शोध घेण्यात यश आले.
घटनेची माहिती ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ तसेच जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अग्निशमन केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.
आज सकाळी पुन्हा अग्निशमन दलाच्या पथकाने रबर बोटीच्या सहाय्याने वाघूर नदीपात्रात कसून शोधमोहीम राबविली. यावेळी नदीच्या पाण्याखाली झाडांमध्ये अरुण कोळी अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. पाण्याखालील झाडांमध्ये अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले.
शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर अरुण कोळी यांना तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आले. तब्बल २४ तासांनंतर शोधकार्याला यश मिळाल्याने अग्निशमन विभागाच्या पथकाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
या शोध व बचावकार्यात टीम प्रमुख प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, योगेश पाटील, किरण महाजन, महेंद्र कोळी आणि विकास सोनवणे, बांभोरी यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.









