१५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली; धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाळधी येथे घराबाहेर अंगणात सार्वजनिक जागी लावलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत रणजीत निंबा भाट (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. भजे गल्ली, माळीवाडा, पाळधी खुर्द, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी धरणगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १३ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून ते १४ मे २०२६ रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली बजाज प्लॅटिना कंपनीची काळ्या-सिल्व्हर रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच १९ सीएल ९११७ ही घराबाहेरील अंगणात सार्वजनिक जागी लावली होती.
दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय सदर मोटारसायकल लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. सकाळी मोटारसायकल जागेवर दिसून न आल्याने चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजता धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही.
या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेश नाईक करीत आहेत. पाळधी दूरक्षेत्राच्या हद्दीत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील दुचाकीधारकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.









