हरिद्वार येथे उद्या बुधवारी अंत्यसंस्कार
जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील भाविकांचा जत्था
चारधाम यात्रेसाठी रवाना झाला असताना यमुनोत्री येथे एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दगडू ओंकार पाटील (वय ६४) यांचा सोमवारी रात्री यमुनोत्री येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सहकारी भाविकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.


दगडू ओंकार पाटील हे पत्नी विठाबाई पाटील यांच्यासह किनगाव बुद्रुक येथील सुमारे २२ भाविकांसोबत २४ सप्टेंबर रोजी चारधाम यात्रेसाठी रवाना झाले होते. २६ सप्टेंबर रोजी हे सर्वजण उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पोहोचले. त्यानंतर विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेत २८ सप्टेंबर रोजी ते यमुनोत्री येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्व भाविक परतीच्या मार्गाला निघाले असताना दगडू पाटील यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सहकारी भाविकांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर दगडू पाटील यांच्यावर हरिद्वार या तीर्थक्षेत्रावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हरिद्वार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीय उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत.
नेदरलँडहून मुलाचा थेट प्रवास
दगडू पाटील यांचा मोठा मुलगा किरण पाटील हे नेदरलँड येथे वास्तव्यास आहेत. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने प्रवास सुरू केला. लंडनमार्गे ते दिल्ली येथे दाखल झाले असून, पत्नी व दोन मुलांसह बुधवारी हरिद्वार येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी पार पडणार आहे. त्यांचा लहान मुलगा चेतन पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून, तेही कुटुंबीयांसह हरिद्वारकडे रवाना झाले आहेत.
दगडू ओंकार पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चारधाम यात्रेदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने किनगाव बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.









