भारतभरातील श्रद्धास्थान असलेल्या गणपतींचे एकाच ठिकाणी दर्शन; जैन इरिगेशनच्या कला विभागातील सहकाऱ्यांची कलाकृती
जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात आकर्षक व भक्तिमय सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमध्ये भारतातील विविध महत्त्वाची श्रद्धास्थाने असलेल्या गणपतींचे दर्शन घडविण्यात आले असून, नागरिकांसाठी ही सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.


जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून ही विशेष सजावट साकारण्यात आली आहे. जैन इरिगेशनच्या कला विभागातील सहकाऱ्यांनी आपल्या कलाकौशल्याचा वापर करून गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
या सजावटीत देशातील विविध भागांतील प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या गणपतींच्या प्रतिकृती व त्यांच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडविण्यात आले आहे. त्यामुळे काव्यरत्नावली चौकात येणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध गणेशस्थळांचा भक्तिमय अनुभव घेता येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात या सजावटीमुळे चौकाचे सौंदर्य आणखी खुलले असून, नागरिकांकडूनही या अभिनव संकल्पनेचे कौतुक होत आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच कलात्मकतेचा सुंदर संगम या सजावटीतून पाहायला मिळत आहे.









