गणपती, गोपाळकृष्ण, लक्ष्मी व कुबेराच्या चांदीच्या मूर्ती चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
रावेर (प्रतिनिधी) : निंभोरा पोलीस ठाणे हद्दीत रावेर तालुक्यातील खिर्डी बु. येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने तब्बल ५७ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय काशीनाथ पाटील (वय ६३, व्यवसाय शेती, रा. खिर्डी बु., ता. रावेर) यांच्या घरात ही चोरी झाली. २९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० वाजता चोरट्याने घराचे बंद गेट व कुलूप तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला.
घरातील चांदीच्या मूर्ती चोरून नेण्यात आल्या. चोरी झालेल्या ऐवजामध्ये २० हजार रुपये किमतीची अंदाजे १०० ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती, ९ हजार रुपये किमतीची अंदाजे ५० ग्रॅम वजनाची गोपाळकृष्ण भगवानाची मूर्ती, १३ हजार रुपये किमतीची अंदाजे ५० ग्रॅम वजनाची लक्ष्मी मातेची मूर्ती आणि १५ हजार रुपये किमतीची अंदाजे ६० ग्रॅम वजनाची कुबेर भगवानाची चांदीची मूर्ती, असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करणारा संशयित अद्याप अज्ञात असून, पोहेकॉं. रिझवान पिंजारी हे प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.









