सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाच्या बैठकीत ठराव
जळगाव : सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज, जळगाव यांच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत समाजासाठी स्वतंत्र भगवान श्री परशुराम भवन उभारण्याचा तसेच त्यासाठी जागा खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

समाजातील महाराष्ट्रीयन सर्व विविध शाखा, संस्था व मंडळांना एकत्र आणून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने परशुराम भवन उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. या भवनाच्या माध्यमातून समाजातील विविध उपक्रम, बैठका, मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थी व युवकांसाठी कार्यक्रम, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच सामाजिक कार्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
परशुराम भवनाचे स्वरूप कसे असावे, त्यामध्ये कोणत्या सुविधा असाव्यात, जागेची निवड कशी करावी तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन भवनाची बांधणी कशा पद्धतीने करावी, याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच पुढील बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.या पुढील बैठकीस सर्व समाजबांधवांना सहभागी करून घेण्यात येणार असून, त्यांच्या सूचना व विचारविनिमयातून परशुराम भवनाचा अंतिम आराखडा व पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, असे यावेळी ठरविण्यात आले.
बैठकीस जळगाव शहरातील विविध ब्राह्मण मंडळे व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. समाजाच्या एकजुटीतून आणि सर्वांच्या सहकार्याने भगवान श्री परशुराम भवनाचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.एकत्रित विचार, सामूहिक प्रयत्न आणि समाजहिताचा संकल्प या भावनेतून झालेली ही बैठक परशुराम भवनाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.








