भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये अत्याचार केल्याची फिर्याद; जालना जिल्ह्यातील तरुणाचा समावेश
भुसावळ (प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख ऋषिकेश वाघ (वय २४, रा. धोंडखेडा, ता. भोकरदन, जि. जालना) याच्याशी ४ जून २०२५ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरू झाला. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
२६ ऑगस्ट २०२५ रोजी महिलेची आरोपीसोबत भेट ठरली होती. त्यानुसार ती अमरावती येथून भुसावळ येथे ऋषिकेश वाघ याला भेटण्यासाठी रेल्वेने आली. भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये दोघांची भेट झाली. तेथे आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे.
त्यानंतर आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन दिल्याने महिलेने तत्काळ पोलिसांत तक्रार केली नसल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मात्र, पुढील काळात आरोपीकडून लग्नाबाबत टाळाटाळ होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आरोपीशी तसेच त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या कुटुंबीयांशी चर्चा झाल्यानंतर लग्नाबाबत समजूत झाल्याने तिने यापूर्वी तक्रार केली नव्हती. मात्र, आरोपी लग्न करण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने १८ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि मोहम्मद सय्यद करीत आहेत. पोलिस कागदपत्रानुसार, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.









