जळगाव ( प्रतिनिधी ) –महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी केवळ बचत न करता योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि भविष्यातील गरजांचा विचार करणे आवश्यक असून उत्पन्नानुसार मासिक खर्चाचे नियोजन, आवश्यक व अनावश्यक खर्चातील फरक, बचतीसाठी ठराविक रक्कम बाजूला काढणे आणि अल्पकालीन तसेच दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे निश्चित करावे आर्थीक स्वातंत्र हा पर्याय असल्याचे मत अरूण चौबे यांनी कार्यशाळेत व्यक्त केले.

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर), जळगाव आणि अडव्हायझर स्किल्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला आर्थिक सक्षमीकरणावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्यावेही ते बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य हा एक पर्याय आहे’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून स्मार्ट बजेटिंग करताना घरगुती खर्च, शिक्षण, आरोग्य, आकस्मिक गरजा आणि भविष्यातील मोठे खर्च यांचा आधीच विचार करण्याचे महत्त्व सांगण्यात आले.
‘उरलेल्या पैशांतून बचत’ करण्याऐवजी बचतीला मासिक आर्थिक नियोजनाचा एक निश्चित भाग बनवणे, छोट्या रकमेची नियमित बचत दीर्घकाळ सुरू ठेवल्यास मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी निधी निर्माण करण्यास मदत होऊ शकते, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.महिलांनी स्वतःच्या नावाने बचत, गुंतवणूक आणि आर्थिक कागदपत्रांची माहिती व्यवस्थित ठेवण्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र निधी, विमा संरक्षण आणि भविष्यातील आर्थिक गरजांनुसार गुंतवणुकीचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. आर्थिक निर्णय घेताना जोखीम, कालावधी आणि उद्दिष्ट यांचा परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक असल्याचेही चौबे यांनी नमूद केले.
आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड आणि गोदावरी आयएमआर यांच्या सहकार्याने ‘इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम’ अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. डिजिटल फायनान्शियल टूल्सचा सुरक्षित वापर तसेच महिलांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व आर्थिक अधिकारांची माहिती कार्यशाळेत देण्यात आली.कार्यशाळेत ३५ हून अधिक महिला प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले. ऑनलाइन संवादादरम्यान सहभागी महिलांनी विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून शंकांचे निरसन करून घेतले. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता, नियोजन क्षमता आणि आर्थिक निर्णयक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.









