जळगाव ( प्रतिनिधी ) – आज बारी समाज माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक ओझोन संरक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक श्री.आर.एस.आंबटकर, प्रभारी पर्यवेक्षक श्री. एस.ए.भदाणे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.नंदा अकोले तसेच सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. आंबटकर सरांनी विद्यार्थ्यांना ओझोन थराचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “ओझोन थर हे पृथ्वीचे सुरक्षा कवच आहे. तो सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतोय.”


या प्रसंगी विद्यार्थ्यांनी “ओझोनचे संरक्षण म्हणजे पृथ्वीचे संरक्षण”, “ओझोन वाचवूया, पृथ्वी जपूया” अशा घोषणा देत जनजागृती केली. इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी ओझोन विषयावर सुंदर कविता आणि भाषणे सादर केली.
मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक श्री आर.एस.आंबटकर यांनी CFC वायूमुळे ओझोनला कशी हानी पोहोचते याची सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्रीमती ए.आर.निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले.









