शिक्षणाचा उद्देश, स्वरूप आणि भारतीय परंपरेचा पुनर्शोधावर भर
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे एक दिवसीय ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाचा उद्देश, स्वरूप आणि भारतीय परंपरेचा पुनर्शोधावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी वर्धा येथील नई तालीम समितीचे सचिव व संचालक प्रभाकर पुसदकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच अनुभूती निवासी स्कुल च्या संचालिका निशा जैन, संस्थेचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार, रिसर्च डीन डॉ. गीता धरमपाल, अंबिका जैन यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यशाळेत अनुभूतीच्या चारही विभागांसह मातोश्री व इंपिरिअल इंटरनॅशनल शाळेच्या ३५ शिक्षकांनी सहभाग घेतला.



गांधीजींची ‘नई तालीम’ आणि स्वदेशी ज्ञानपरंपरेवर चिंतन
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभाकर पुसदकर यांनी नई तालीम या विषयावर विचारप्रवर्तक सत्र घेतले. शिक्षकांनी शिक्षणाच्या मूळ उद्देशाचा पुनर्विचार करावा आणि नई तालीमची तत्त्वे आजच्या प्रत्यक्ष शैक्षणिक व्यवहारात कशी उतरवता येतील, यावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. इतर सत्रांमध्ये प्रा. गीता धरमपाल यांनी भारताच्या समृद्ध शैक्षणिक वारशावर आणि प्रसिद्ध विचारवंत धरमपाल यांच्या संशोधनावर प्रकाश टाकला. बाल व विद्या निकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांनी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन अनुभवाधारित शिक्षण विषयावर भर दिला. देवयानी मनोज यांनी सहभागी आणि चिंतनात्मक उपक्रमांद्वारे शिक्षकांना मुलांच्या गरजांप्रती संवेदनशील राहण्याचे आणि शिक्षक-पालक भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. अनूभूती निवासी विद्यालयाचे इंग्रजी शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी शिक्षणातील भाषा, संवाद आणि सहभागाचे महत्त्व पटवून दिले.

‘त्रिवेणी एज्युकेटर्स नेटवर्क’ ची घोषणा
कार्यशाळेचा समारोप ‘TRIVENI Educators Network’ स्थापन करण्याच्या संकल्पनेने झाला. या नेटवर्कच्या माध्यमातून भविष्यात सर्व शिक्षकांना एका व्यासपीठावर आणून अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि मिळालेली अंतर्दृष्टी वर्गात प्रत्यक्षात आणणे सुलभ होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रिसर्च फेलो गिरीश पाटील व रिसर्च असिस्टंट मोनालिसा सोमवंशी यांनी केले.









