अंजाळे गावाजवळ भरधाव बोलेरोने मोटारसायकलला जोरदार धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
यावल : तालुक्यातील अंजाळे गावाजवळ बोलेरो वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण शामराव कोळी (वय ५५, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, रा. कठोरा, ता. यावल, सध्या रा. रायपूर, ता. जि. जळगाव) यांचा मुलगा गिरीश अरुण कोळी हा मोटारसायकल क्रमांक एमएच १९ डी.यू. ८४१८ वरून यावलकडून भुसावळच्या दिशेने जात होता.
२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता अंजाळे गावातील बसस्टॉपजवळ हा प्रकार घडला. यावेळी भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या बोलेरो क्रमांक जीजे १९ झेड १८०९ वरील चालक संदीप शांताराम पाटील (रा. मजरे हिंगोणा, ता. चोपडा) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
बोलेरोने गिरीश कोळी यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहेकॉ/२४८१ उमेश सोनप हे पुढील तपास करीत आहेत.









