
धरणगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१० वाजता पाळधी-बांभोरी रस्त्यावर, खुबचंद सागरमल पेट्रोल पंपाजवळ तसेच बांभोरी प्रचा धरणगावसमोर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी एका विनानंबरच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच संबंधित कागदपत्रांची चौकशी केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली.
या कारवाईत ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू आणि सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचा विनानंबरचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली, असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अजिज शेख असलम (वय ३४, रा. नम्रता कॉलनी, पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव) याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२ तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना वाळू वाहतूक करून शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने वाळूची वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संदीप खंडारे करीत आहेत.









