खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता


भावेश पोपट पाटील याला न्यायालयाचा प्रोबेशनचा लाभ; जखमीला १५ हजार रुपये नुकसानभरपाईचे आदेश
जळगाव, : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी बुद्रुक येथे डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी भावेश पोपट पाटील याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ अन्वये दोषी ठरविले. मात्र त्याचे वय, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे आणि सुधारण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट, १९५८ च्या कलम ४ अंतर्गत लाभ देण्यात आला. पुराव्याअभावी सहआरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मारहाण करून चाकूने वार
१६ डिसेंबर २०२१ रोजी खेडी बुद्रुक येथे धनराज गजानन कोळी यांच्यावर मारहाण करून चाकूने वार करण्यात आले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली.
१४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या
खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. जखमी साक्षीदाराची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि जप्त करण्यात आलेले हत्यार या महत्त्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी. बी. चौधरी आणि ॲड. एन. डी. चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या पुराव्यांच्या आधारे भावेश पाटील याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने मान्य केले.
न्यायालयाने भावेश पाटील याला तीन वर्षे चांगल्या वर्तनाच्या अटीवर ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेवढ्याच रकमेचा जामीनदार देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या कालावधीत कोणताही गुन्हा करू नये किंवा शांतता भंग करू नये, अशी अट घालण्यात आली आहे.
न्यायालयाने जखमी धनराज कोळी यांना १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले असून, आणखी १५ हजार रुपये कार्यवाहीचा खर्च भरण्याचे आदेश भावेश पाटील याला देण्यात आले आहेत.
भावेश पाटील याच्या वर्तनावर जिल्हा परिविक्षा अधिकारी, जळगाव लक्ष ठेवणार आहेत.दरम्यान, या गुन्ह्यातील सहआरोपी संदीप पोपट पाटील, शिवाजी कडूबा पाटील यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दोष सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.









