सावदा शहरातून सहा बकऱ्यांची चोरी; १८ हजारांचे नुकसान


चराईसाठी सोडलेल्या बकऱ्या लंपास; दोन संशयितांविरुद्ध सावदा पोलिसांत गुन्हा दाखल
सावदा | प्रतिनिधी : सावदा शहरातील बडाआखाडा परिसरातून सहा बकऱ्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या बकऱ्यांची एकूण किंमत सुमारे १८ हजार रुपये असून, याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान सावदा शहरातील बडाआखाडा परिसरात ही घटना घडली. सय्यद हुसेन रेहमान (वय ६५, व्यवसाय मजुरी, रा. बडा आखाडा, ता. रावेर) यांनी त्यांच्या सहा बकऱ्या सकाळी शहरात चराईसाठी सोडल्या होत्या.
सायंकाळी बकऱ्या परत न आल्याने शोध घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत. दरम्यान, आपल्या व साक्षीदारांच्या बकऱ्या संशयित सय्यद साहील सय्यद साबीर याने चोरल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयिताने त्यांच्या संमतीशिवाय बकऱ्या लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचा आरोप आहे. चोरी झालेल्या सहा बकऱ्यांची किंमत अंदाजे १८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सय्यद साहील सय्यद साबीर आणि अन्य एका संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक २१८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
घटनेची नोंद झाल्यानंतर सावदा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. क्रमांक १३९९ मोहसिनखान पठाण करीत आहेत. चोरीला गेलेल्या बकऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.









