जळगावात तब्बल २ कोटी १५ लाखांची सायबर फसवणूक; बँक खाती उघडून रक्कम वळविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा


जळगाव : ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून तब्बल २ कोटी १५ लाख ३९ हजार २३० रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातील व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराने संगनमत करून विविध बँक खात्यांचा वापर करत फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी प्रमोद फकीरा वाडीले (वय ४०, व्यवसाय नोकरी, रा. पोलिस वसाहत, नवीन बिल्डिंग, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून करण सांखला ऊर्फ सैनी, रा. रायसोनी नगर, जळगाव, मूळ रा. मेढता सिटी माळीओ का मोहल्ला, नागौर, राजस्थान आणि त्याचा साथीदार टोनी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षाच्या कालावधीत रक्कम हडप
पोलिसांच्या माहितीनुसार, ९ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून विविध व्यक्तींच्या नावाने बँक खाती उघडली. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आला.
जळगाव पीपल्स बँकेच्या खात्यात ९ जुलै २०२४ ते ७ मार्च २०२५ या कालावधीत तब्बल २ कोटी १४ लाख ७२ हजार ९८९ रुपये, तर जळगाव जनता बँकेच्या खात्यात २९ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ६६ हजार २४१ रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशा प्रकारे एकूण २ कोटी १५ लाख ३९ हजार २३० रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले.
आरोपींनी सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव पीपल्स बँक आणि जळगाव जनता बँक यांसह विविध बँकांमध्ये एकूण सात खाती उघडून सायबर फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळविल्याचा आरोप आहे.
या बँक खात्यांविरोधात देशभरातून सायबर फसवणुकीच्या ११ तक्रारी प्राप्त झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे आरोपींचा सायबर फसवणुकीच्या टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी कटकारस्थान रचून बँक खाती उपलब्ध करून दिली आणि त्यामध्ये सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारून इतरांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३१८(४), ३(५), ११२(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे









