मांडुर्णे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त


मेहुणबारे पोलिसांची कारवाई; ३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
चाळीसगाव : मांडुर्णे शिवारातून गिरणा नदीपात्रातून शासनाच्या मालकीची गौण खनिज वाळू अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मेहुणबारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व वाळूसह एकूण ३ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालकासह ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला
२० ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ११.४० वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने मांडुर्णे शिवारातील मांडुर्णे ते साकूर फाटा रस्त्यावर कारवाई केली. यावेळी शासनाच्या मालकीची गौण खनिज वाळू विनापास परवानगी वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १८ झेड ३६२६ क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये, तर वाहतूक करण्यात येत असलेल्या गौण खनिज वाळूची किंमत सुमारे ६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चालक व मालकाविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर राजधर गायकवाड (वय २७) आणि मालक समीर नुरमोहम्मद पिंजारी, दोघे रा. मांडुर्णे, ता. चाळीसगाव, यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी व शासनाच्या गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांची धडक कारवाई
ही कारवाई मेहुणबारे पोलिसांनी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मनोज पाटील करीत आहेत. अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.









