नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम


पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे, स्वच्छता आणि मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले
प्रतिनिधी | जळगाव
जळगाव शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महानगर शाखेच्या वतीने गुरुवारी (२० ऑगस्ट) महापालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे दोन तास ठिय्या देत घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्त व महापौरांना घेराव घालत विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील अनेक भागांत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कोणतीही पूर्वसूचना न देता महिन्यातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा पुढे ढकलला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
पाणीपुरवठाच सुरळीत नसताना महापालिका प्रशासन वॉटर मीटर बसवून पाणीपट्टी वसुलीची तयारी करीत असल्याचा आरोप करत, शहराला २४ तास सुरळीत पाणीपुरवठा करण्याची क्षमता तपासल्यानंतरच वॉटर मीटरचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मंजुरी मिळूनही कामे न करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाई करून अन्य मक्तेदारांमार्फत तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शहरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत आणि अजिंठा चौफुली ते विमानतळ परिसरातील रखडलेले सौर पथदिवे कार्यान्वित करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीशहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शिवाजीनगर उड्डाणपुलावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा आणि गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला पुलावरील लोखंडी जिना तातडीने उभारावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याशिवाय मेहरुण शिवारातील उद्यान परिसरातील स्मशानभूमीत आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.शहरातील नागरी समस्या येत्या १५ दिवसांच्या आत सोडवण्यात न आल्यास महापालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी प्रशासनाला दिला.
या आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, प्रदेश चिटणीस प्रतिभाताई शिरसाट, विकासदादा पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, सुनील भैय्या माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.








