भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय
जिल्हा पेठ पोलीस ठाण्यासमोरच वाहतुकीचा बोजवारा; रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह वाहनधारकांचे हाल


जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा पेठ पोलीस ठाण्यासमोर असलेल्या भास्कर मार्केटमध्ये विविध प्रकारची दुकाने असून, अनेक व्यावसायिक या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, याच मार्केट परिसरात गॅरेज, वाहनांना सीट कव्हर लावण्याची दुकाने तसेच जुन्या वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यावर वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग
जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक खरेदी तसेच विविध कामांसाठी भास्कर मार्केटमध्ये येतात. मात्र, गॅरेजच्या कामासाठी आलेली वाहने तसेच सीट कव्हर लावण्यासाठी आणलेल्या गाड्या रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असून, अनेक वेळा वाहनांची ये-जा करणेही कठीण होते.
रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांचे हाल
मार्केट परिसरात काही रुग्णालये असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वाहने उभी असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठीही पुरेशी जागा राहत नसल्याची स्थिती आहे.
पोलिस ठाण्यासमोरच समस्या
विशेष म्हणजे, भास्कर मार्केट अगदी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या समोर असतानाही रस्त्यावर होणाऱ्या अडथळ्यांवर अद्याप ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुकानदारांना त्रास न देता उपाययोजना करण्याची मागणी
दुकानदारांचा व्यवसाय आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेता त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालक व गॅरेजधारकांना वाहने शिस्तीत आणि रस्त्याच्या बाजूला उभी करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच, आवश्यक असल्यास पार्किंगसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी.
यामुळे दुकानदारांचा व्यवसायही सुरळीत राहील आणि नागरिकांची ये-जा देखील सुकर होईल. प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









