जळगावात सुवर्ण कारागिराची २.४५ कोटींची फसवणूक; पावणे दोन किलो सोने घेऊन भामटे पसार


ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ दरम्यानचा प्रकार; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
जळगाव: जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात विश्वासाचा फायदा घेत २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शनिपेठ परिसरातील सुवर्ण कारागीर नबाकुमार गोरहरी धारा यांना संशयित आरोपी विद्युत निरोध बाग आणि राजू बिपीन चौधरी यांनी तब्बल १७५५.३४० ग्रॅम सोन्याचा गंडा लावला आहे.
आरोपींनी ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत नबाकुमार धारा यांच्याशी व्यावसायिक संबंध निर्माण करून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेतले होते. या दागिन्यांच्या बदल्यात २४ कॅरेट सोन्याची लगड किंवा रोख रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे किंवा सोन्याची लगड न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी नबाकुमार धारा यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फसवणूक करणारे दोन्ही संशयित आरोपी फरार झाले असून त्यांचे धागेदोरे पश्चिम बंगालशी जोडलेले असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.









