कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार


जळगाव (प्रतिनिधी) : पोलिस दलात कर्तव्य बजावताना कर्तव्यनिष्ठेसोबतच माणुसकी जपणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकासह विविध सन्मान मिळविणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिसांच्या कार्याचा गौरव करतानाच, केंद्रात दाखल रुग्णांना सकारात्मक विचार, चांगली संगत आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, राष्ट्रपती पदक प्राप्त दिनेश बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील, विजयसिंग पाटील, प्रदीप पाटील , जयंत चौधरी यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कठीण परिस्थितीत काम करताना केवळ कायद्याची अंमलबजावणी न करता माणुसकी जपणे, हीच या सन्मानामागची खरी पावती असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक ज्ञानेश मोरे , जैन इरिगेशन चे अनिल जोशी ,डॉ सुदर्शन पाटील प्रवीण पाटील , डॉ अमित चित्ते , चंद्रशेखर नेवे , रागीव अहमद , किशोर कुलकर्णी ,निलेश काळे आदी उपस्थित होते .
जैन इरिगेशनचे मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी यांनी पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. दिवसरात्र, वेळेचे कोणतेही बंधन न ठेवता काम करणाऱ्या पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. त्यांच्या कामाची दखल शासनाकडून घेतली जाणे ही अभिमानाची बाब असून, समाजानेही त्यांच्या कार्याची सकारात्मक दखल घ्यावी, असे ते म्हणाले.
डॉ. अमित चित्ते यांनी व्यसनाधीनतेमागे नकारात्मक विचार आणि चुकीची संगत हे प्रमुख घटक असल्याचे सांगितले. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज गुन्हेगारी व नकारात्मक घटनांना सामोरे जावे लागते. अशा वातावरणातही मानसिक संतुलन आणि माणुसकी जपत कर्तव्य बजावणे आव्हानात्मक असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल रुग्णांनीही चांगली संगत स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वेळेवर आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम या गोष्टी पोलिस कर्मचाऱ्यांसाठीही तितक्याच महत्त्वाच्या असून, सततच्या रात्रपाळीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कर्तव्याबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्यालाही प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
विजयसिंग पाटील यांनी व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांना सकारात्मक मित्रांची संगत ठेवण्याचा सल्ला दिला. चुकीच्या संगतीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगत, भूतकाळ मागे सोडून सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुदर्शन पाटील यांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करत, रुग्णांनी केंद्रातील मार्गदर्शनाचा पूर्ण लाभ घ्यावा असे आवाहन केले. व्यसनामुळे शरीर आणि कुटुंब दोघांचेही नुकसान होते, त्यामुळे व्यसनापासून दूर राहून आरोग्यदायी जीवन जगण्याचा संकल्प करावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक ज्ञानेश मोरे यांनी पोलिस दलाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. पोलिसांचे कार्य केवळ गुन्हेगारांवर कारवाई करण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा व आधाराचा विश्वास देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तींना पुन्हा सकारात्मक जीवनाकडे नेण्याचे काम केंद्राच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडील, पत्नी आणि मुलांच्या अपेक्षा लक्षात घेऊन व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे विशेष अभिनंदन केले.
पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी व्यसनमुक्तीचा निर्णय घेणाऱ्या रुग्णांचे कौतुक केले. व्यसन सोडण्याचा निर्णय हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून, कुटुंबीयांच्या अपेक्षा लक्षात घेऊन व्यसनापासून कायम दूर राहण्याचा निर्धार करावा, असे ते म्हणाले. अनेक कौटुंबिक तसेच गंभीर गुन्ह्यांना व्यसनच खतपाणी घालते, त्यामुळे व्यसनाला कायमचा निरोप देऊन चांगला नागरिक म्हणून समाजात परतावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करतानाच, व्यसनमुक्त जीवनाची नवी सुरुवात करण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.









