भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता


भुसावळ : भुसावळ रेल्वे यार्ड पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका गोदामात पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाचा खालचा भाग कुजून खाली पडलेल्या अवस्थेत होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक पाकीट आढळून आले. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो मिळाले. आधार कार्डवरील नाव योगेश विजय वाघधरे, वय २३ वर्षे, रा. ठाणेगाव, ता. कारंजा, जि. वर्धा असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आधार कार्डवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी कारंजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथे मिसिंग क्रमांक ३०/२६, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी विजय रामचंद्र वाघधरे यांनी आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याची खबर दिल्याचे समोर आले.
तक्रारीनुसार, योगेश वाघधरे हा १२ जुलै २०२६ रोजी उज्जैनला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने त्याच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती.
भुसावळ पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे. मृतदेहाची अधिकृत ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.









