नयनतारा मॉलचे मुख्य शटर कोसळले; एक जखमी


अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत केली मदत
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील नयनतारा मॉल येथे आज सकाळी मुख्य प्रवेशद्वाराचे मोठे शटर अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत अब्दुल रहीम शेख (रा. शिवाजीनगर) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू कार्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एका व्यक्तीने अग्निशमन विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नयनतारा मॉलचे मुख्य गेटचे शटर खाली कोसळल्याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी करून बचावकार्य केले.
या घटनेत अब्दुल रहीम शेख हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेमुळे मॉल परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शटर नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.









