तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन
पाचोरा तारखेडा बु., ता. पाचोरा : तारखेडा बु. येथील गावापासून नामदेव झिपरू बागुल यांच्या शेतापर्यंत पूर्वापार वापरात असलेला शेतरस्ता रेल्वे विभागाने गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून बंद केल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
सदर रस्ता गट क्र. ३६५/१ ते ३६५/१५ या परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या रस्त्यावर परिसरातील जवळपास १०० ते १५० शेतकरी अवलंबून आहेत. रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे १०० ते २०० हेक्टर शेती क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता असून, शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
शेतामध्ये खते, बी-बियाणे, औषधे, शेतीची अवजारे व इतर साहित्य नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असून, अनेक वेळा साहित्य डोक्यावर घेऊन न्यावे लागत आहे. तसेच शेतामध्ये एखादी दुर्घटना, सर्पदंश किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णाला तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
रस्ता बंद राहिल्यास शेतीची कामे वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेती पडीत पडण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट व कर्जबाजारीपणाचे संकट ओढवू शकते. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे रेल्वे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून सदर पूर्वापार वापरातील शेतरस्ता पूर्ववत सुरू करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
“शेतरस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतीचा जीवनमार्ग आहे. तो बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा मार्ग तातडीने पूर्ववत होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली.


चौकट- दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून रस्ता पूर्ववत सुरू करून द्यावा अशी मागणी करत शेतकऱ्यांची व्यथा मांडली तर खासदार स्मिता वाघ यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना होणार त्रास दूर केला जाईल असे आश्वासन दिले…









