डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात


जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महाविद्यालयात भारतातील प्रख्यात ग्रंथालयशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय ग्रंथालय दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि ज्ञानवृद्धीसाठी पुस्तक वाचनाची सवय लागावी, या उद्देशाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश सरोदे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाची माहिती देतांना भारतातील आधुनिक ग्रंथालय चळवळीच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे शास्त्रीय वर्गीकरण करण्यासाठी “कोलन वर्गीकरण” ही पद्धत विकसित केली. तसेच भारतात ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाचा प्रसार आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९५७ मध्ये ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालयाचे महत्त्व, पुस्तक वाचनाचे फायदे तसेच शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये ग्रंथालयाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. डिजिटल युगात माहिती मिळविण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असले, तरी पुस्तक वाचनातून मिळणारे सखोल ज्ञान आणि चिंतनाची सवय यांचे महत्त्व कायम आहे, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, ज्ञानार्जन आणि ग्रंथालयाच्या वापराबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.


 

 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!