गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात


जळगाव : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आय.एम.आर.) महाविद्यालयात भारतातील प्रख्यात ग्रंथालयशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय ग्रंथालय दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश सरोदे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शियाली रामामृत रंगनाथन हे भारतातील प्रसिद्ध ग्रंथालयशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १८९२ रोजी मद्रास प्रेसिडेन्सीतील शियाली येथे झाला. भारतातील आधुनिक ग्रंथालय चळवळीच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाचा प्रसार आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९५७ मध्ये ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालयाचे महत्त्व, पुस्तक वाचनाचे फायदे तसेच शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये ग्रंथालयाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे पुस्तकांचे वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी आणि वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी सखोल ज्ञान, चिंतनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तक वाचनाचे महत्त्व कायम आहे, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची माहिती देण्यात आली.कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!