जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!


४५ लाखांच्या लक्झरी बसच्या चोरीने खळबळ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर (विशेष प्रतिनिधी): जामनेर शहरातील बस आगार (बस डेपो) परिसरातून तब्बल ४५ लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची लक्झरी बस एका अज्ञात चोरट्याने लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. १० ऑगस्ट २०२६) मध्यरात्री २:२० वाजेच्या सुमारास ही धाडसी चोरी झाली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय घडली घटना?
जामनेर बस डेपो परिसरात ‘राजमाता जिजाऊ’ असे लिहिलेली आणि ‘केसरी’ (ऑरेंज) रंगाची ‘अशोक लेलँड’ कंपनीची बीएस-६ मॉडेल असलेली बस (क्र. MH-14 NE-4214) उभी करण्यात आली होती. १० ऑगस्टच्या मध्यरात्री २:२० वाजेच्या सुमारास एका अज्ञात भामट्याने कोणतीही परवानगी न घेता ही बस चालू केली आणि आगार परिसरातून पळवून नेली.
सकाळी बस जागेवर दिसून न आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगारातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी तातडीने शोधाशोध केली असता बस चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी जामनेर बस डेपोचे आगार व्यवस्थापक (डेपो मॅनेजर) दिनेश इंदल नाईक (वय ३३, रा. आगार व्यवस्थापक निवासस्थान, जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. सहाय्यक फौजदार विलास महाजन या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून परिसरातील सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे चोरट्याचा आणि बसचा शोध सुरू आहे. एसटी डेपोसारख्या सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणाहून थेट ४५ लाखांची बसच चोरीला गेल्याने वाहतूक क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे.









