आभोडा बुद्रुक येथे ‘जाब विचारल्याच्या’ रागातून तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


रावेर (विशेष प्रतिनिधी): घरासमोरून दुचाकी नेल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक वादानंतर जाब विचारण्यास गेलेल्या माय- लेकाला शिवीगाळ करत एका तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. रावेर तालुक्यातील आभोडा बुद्रुक येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नसिब जलदार तडवी (वय १८, रा. आभोडा बुद्रुक, ता. रावेर) हा आरोपी कुणाल अनिल तायडे (रा. आभोडा बुद्रुक) याच्या घरासमोरून दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या आजीने “कोणाची औलाद आहे” असे बोलून हिणवले. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी नसिब तडवी व त्याची आई आरोपीच्या घरासमोर गेले असता, त्याचा राग धरून आरोपी कुणाल तायडे याने दोघांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.
तसेच, वादादरम्यान आरोपी कुणाल याने नसिब याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून त्याला रक्तबंबाळ व गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर जखमीचे वडील जलदार बलदार तडवी (वय ४०, व्यवसाय-मजुरी, रा. आभोडा बु.) यांनी रावेर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:२६ वाजेच्या सुमारास आरोपी कुणाल अनिल तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. ३७८/२०२६).
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोज जनार्दन महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील (पोहेकॉ/१५५९) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









