जळगाव हादरले! शाळेजवळ विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना


अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात होणार रवानगी ; शाळा परिसरात गस्त वाढवण्याची पालकांची आक्रमक मागणी
जळगाव: शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून थेट चॉपरसारख्या जीवघेण्या शस्त्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. परिसरात एक शाळेजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि अल्पवयीन मुलांमधील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण शहर हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आयुष भोपळे या विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हल्ला करणारा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करून पुढील बालसुधार गृहाची कारवाई केली जाणार आहे.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेले इतर विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे हल्ल्याचा नेमका घटनाक्रम स्पष्ट केला जात आहे.
पालकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण
शाळेच्या अगदी जवळ आणि दिवसाढवळ्या असा प्राणघातक हल्ला झाल्याने इतर पालकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा परिसरात पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी आणि घातक शस्त्रे बाळगणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी नागरिक व पालकांकडून केली जात आहे.









