जळगावातील भवानीपेठेत गोडाऊनसमोरून ५२ हजारांची मशिनरी लांबवली; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल


जळगाव: शहरातील भवानीपेठ भागात असलेल्या एका मशिनरी गोडाऊनच्या समोर ठेवलेले वेल्डिंग आणि ग्राइंडर मशिन्स अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ५२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असून, या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भवानीपेठ येथील रहिवासी झैनुल आबेदीन हुसैनी मुल्ला (वय ३७) यांचा मशिनरी विक्रीचा व्यवसाय आहे. १७४, भवानीपेठ येथील त्यांच्या गोडाऊनसमोर विक्रीसाठी आलेला मशिन्सचा साठा ठेवलेला होता. दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने संधी साधून गोडाऊनसमोर ठेवलेले २४ हजार रुपये किमतीचे ३ वेल्डिंग मशिन्सचा १ बॉक्स आणि २८ हजार ८०० रुपये किमतीचे १६ ग्राइंडर मशिन्स असलेले २ बॉक्स, असा एकूण ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर झैनुल मुल्ला यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ६ ऑगस्ट रोजी रात्री ११:३७ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिंपी व शनिपेठचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय खैरे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.









