मध्यरात्री अज्ञात चोरट्यांचा डाव; मारवड पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू
अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चौबारी व गलवाडे परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत तीन दुचाकी लंपास केल्या. या घटनेत एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टच्या मध्यरात्री ते ३ ऑगस्टच्या पहाटे दरम्यान चौबारी व गलवाडे गावातील फिर्यादी व साक्षीदार यांच्या घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन (एमएच-१९-ईई-१८९६) किंमत २५ हजार रुपये, होंडा शाईन (एमएच-१२-एचजी-३२३४) किंमत २२ हजार रुपये आणि बजाज प्लॅटिना (एमएच-१९-ईसी-०७०५) किंमत २० हजार रुपये अशा तीन दुचाकींचा समावेश असून, एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
याप्रकरणी चौबारी येथील रामदास निंबा पाटील (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









