दिवसा घरफोडी; २.५२ लाखांचा ऐवज लंपास
चोपडा शहरातील सुदर्शन कॉलनीतील घटना; रोकड, सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले


चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्यांनी घरातून रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रामकृष्ण महाजन (वय ३३, रा. प्लॉट क्रमांक ३१, सुदर्शन कॉलनी, यावल रोड, चोपडा) यांनी याबाबत तक्रार दिली. दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.५० ते १०.४५ या वेळेत त्यांनी घराला कुलूप लावून पत्नीला क्लासला सोडण्यासाठी बाहेर गेले होते.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर फोडून त्यातील २ लाख रुपये रोख रक्कम, सुमारे ५२ हजार रुपयांचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच काही चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.









