शेतातील मोटार व सोलर पंपाच्या वायरींची चोरी; २० हजारांचा ऐवज लंपास

बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द शिवारातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
बोदवड | प्रतिनिधी
बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द शिवारात अज्ञात चोरट्यांनी विविध शेतांतील मोटार व सोलर पंपांच्या वायरी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात BNS कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कौतिक काशीनाथ पाटील (वय ५८, रा. जलचक्र खुर्द, ता. बोदवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील मोटारींच्या तसेच सोलर पंपाच्या मागील वायरी कापून चोरून नेल्या.
अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
या चोरीत फिर्यादींसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांतील मोटार वायरी चोरीस गेल्या आहेत. चोरीस गेलेल्या वायरींची एकूण किंमत सुमारे २० हजार ३५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आयुब गंभीर तडवी पुढील तपास करीत आहेत.









