बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शटर वाकवून चोरट्यांचा धाडसी डाव; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
बोदवड | प्रतिनिधी
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे सरकारी मान्यताप्राप्त देशी दारू दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३९ हजार १७८ रुपयांचा मद्यसाठा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडगाव येथील सोनोटी रोडवरील ‘प्यासा देशी बार’ या सरकारी मान्यताप्राप्त देशी दारू दुकानात १ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान चोरी झाली. दुकानमालक सागर धनराज जैस्वाल (वय ४८, रा. बोदवड) यांनी याबाबत फिर्याद दिली.
चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि विविध ब्रँडच्या देशी दारूच्या बाटल्या तसेच बिअरचा साठा चोरून नेला.
३९ हजारांचा मुद्देमाल चोरी
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या पेट्या, टँगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या पेट्या, ९० एमएलच्या बाटल्यांचा साठा तसेच कॅनॉन कंपनीच्या बिअरच्या पेट्यांचा समावेश असून, एकूण ३९ हजार १७८ रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक आशीष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव यांच्या देखरेखीखाली पोहेकॉ संतोष चौधरी पुढील तपास करीत आहेत.









