गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर: मुक्ताईनगर बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत (मिनी मंगळसूत्र) चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रावेर तालुक्यातील कांडवेल येथील रहिवासी सौ. संगीता राजकुमार पाटील (वय ३८, व्यवसाय- गृहिणी) या १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बसस्थानकावर आल्या होत्या. तेथून प्रवासासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीची संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चलाखीने चोरून नेली.
चोरीस गेलेल्या सोन्याच्या पोतीत ३ ग्रॅम वजनाचे मणी-मंगळसूत्र असून त्याची अंदाजे किंमत ९ हजार रुपये आहे. आपल्या गळ्यातील दागिना गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगीता पाटील यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.२२ वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तपासात ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेश चव्हाण (बकल नंबर ९०१) करत असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.









