तरवाडे येथे घरफोडी; रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ₹६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा दगा पाटील (वय ५५, रा. तरवाडे, ता. चाळीसगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ३१ जुलै रोजी रात्री १० ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
यानंतर घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले ₹५ हजारांची रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ पाटील करीत आहे.









