मुंबई (वृत्तसंस्था) – ‘कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयसीयू बेडची सुविधा असलेली रुग्णालये उभारणे हे महाराष्ट्राचे मोठे काम आहे. अशी सुविधा देशात कुणी उपलब्ध केली असेल असे मला वाटत नाही. त्यामुळं या रुग्णालयांचे फोटो मला द्यावेत. पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र प्रशासनाचे हे कर्तृत्व मला दाखवायचं आहे. कोरोनाच्या कहरामुळे महाराष्ट्र हा डगमगलेला नसून त्यास लढा देत आहे असे देशाला दाखवून द्यायचे आहे.’ असे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एमएमआरडीएनं उभारलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोविड रुग्णालयाचे आणि ठाण्यातील कोविड सेंटरचं ई लोकार्पण झाले. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
‘यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासन, एमएमआरडीए व अन्य शासकीय यंत्रणांनी गेल्या दोन महिन्यांत आरोग्य सुविधांच्या बाबतीत जे काही काम केले आहे त्याबाबत तोंडभरून कौतुक केले.’ दरम्यान ते म्हणाले की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, रोज नवनवीन आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले जात आहे. ठाणे, रत्नागिरी, औरंगाबाद सह इतर जिल्ह्यातही विविध आरोग्य सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आज महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा बघता इतर कुठेही अशी परिस्थिती राहिली असती तर ते हबकून गेले असते. पण आपण डगमगलो नाही आणि परिस्थीतीला सामोरे गेलो. जेव्हा कोरोना विषाणूची साथ आली तेव्हा याची चाचणी करण्यासाठी फक्त दोन लॅब उपलब्ध होत्या.
पण आता दोन-सव्वा दोन महिन्यांच्या काळातच लॅबची संख्या ही शंभरच्या आसपास पोहोचली आहे. सध्या ठाणे येथे नवीन लॅब तयार होत आहे. तसेच डॉक्टरांची एक दुसरी टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आली आहे. या दोन्हीही टीम आरोग्य सेवा पुरविण्यासोबतच उत्तम मार्गदर्शनही करत आहेत. असे प्रशस्तीपत्रकही मुख्यामंत्र्यांनी दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कालच मी कोरोना विषाणूवर प्रभावी औषध सापडल्याची बातमी पाहिली. त्यानंतर टास्क फोर्समधील डॉक्टरांशी चर्चा केली असता समजले की या औषधाचा वापर आपण अनेक दिवसांपासून करत आहोत. यावरून असे स्पष्ट होते की कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या बाबतीत जग आपल्यापेक्षा मागे आहे आणि आपण काहीशा प्रमाणात पुढे आहोत.’







