जळगाव (प्रतिनिधी)- कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत राज्यसरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सरकारी कार्यालयांसाठी मार्गदर्शक सुचना लागु केल्या आहेत. राज्यातील सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयांसाठी त्या लागु होतील. टप्प्याटप्प्याने ही कार्यालये सुरू झाल्यावर गर्दी वाढेल, हे लक्षात घेवून या सुचना देण्यात आल्या आहेत.
कार्यालयांमध्ये येणारे कर्मचारी व अभ्यागतांचे तापमान थर्मल स्कॅनर अथवा इफ्रारेड थर्मामिटरने तपासावे, कार्यालयांमध्ये हवा खेळती असावी, कर्मचार्यांनी 3 पदरी मास्क वापरणे सक्तीचे असावे, अधिकारी व कर्मचार्यांनी नाकाला, डोळ्यांना व तोडाला वारंवार हात लावू नये. सर्दी,खोकल्याचा त्रास असेल तर रूमालाचा वापर करावा. रूमालासह दररोज धुतलेले कपडे असावेत. कार्यालयांमध्ये हात धुण्याची आणि बंद कचरापेट्यांची व्यवस्था असावी. दोन कर्मचार्यांमध्ये तीन फुट अंतर राहील, अशी बैठक व्यवस्था असावी. कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर सॅनीटाईझर आणि स्वच्छता गृहांमध्ये साबण असावेत. लिफ्टचे बटन, टेबल,खुर्च्या आदी वस्तु सोडीयम हायपो क्लोराईड सोलुशन वापरून दिवसातुन तीन वेळा स्वच्छ केल्या जाव्यात.संगणक, स्कॅनर, प्रिंटर अश्या वस्तुंचे सॅनिटॅझरने निर्जंतुकीकरण करून दिवसातुन दोन वेळा करावे. सफाई कर्मचार्यांना हातमोजे, रबराचे बुट, मास्क वापरणे सक्तीचे असावे. या सुचनांचा उल्लेख कार्यालयांच्या दर्शनी भागात सर्वांना दिसेल, असा असावा. एकाच वाहनातुन अनेक कर्मचार्यांनी प्रवास करू नये. ई-मेल व ऑनलाईन काम करण्यावर भर द्यावा. बैठकांसाठी अधिकारी, कर्मचार्यांना प्रत्यक्ष बोलवू नये, व्हिडीओ कॉन्फ्ररन्सचा वापर करावा., कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्र डबा खाणे किंवा कामासाठी सगळ्यांनी सोबत बसणे टाळावे. एखादे काम अनेक व्यक्ती करणार असतील तर त्यांच्यात दोन-तीन व्यक्तींचे गट पाडावेत. कुणाचाही ताप 100.4 डिग्री फॅरन हाईट पेक्षा जास्त असल्यास त्यांना डॉक्टरांकडे न्यावे. कोरोना पॉझीटीव्ह निदान झाल्यास 14 दिवस कार्यालयात येवू देवू नये. कामासाठी 15 मिनीटांपेक्षा जास्त संपर्क एक-मेकांशी ठेवू नये. हायरिस्क कर्मचार्यांचे संस्थात्मक विलगीकरण करावे. कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करतांना एका बादलीत पाणी आणि डिटर्जेंट दुसर्या बादलीत स्वच्छ पाणी आणि तिसर्या बादलीत सोडीयम हायपोक्लोराईड वापरावेत. दरवाजे, खिडक्या या द्रावणाने पुसुन घ्याव्यात. अशा या सुचना देण्यात आल्या आहेत.







