जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

चोपडा तालुक्यातील गौ-यापाडा येथे घटना; गुन्हा दाखल
चोपडा | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील गौ-यापाडा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर विटेने हल्ला करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास गौ-यापाडा गावात फिर्यादी वालसिंग भायलाल पावरा (वय ५५, रा. गौ-यापाडा, ता. चोपडा) यांच्या घरासमोर ही घटना घडली.
जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी भरत भिकनसिंग मेहता (रा. गौ-यापाडा, ता. चोपडा) याने फिर्यादीच्या डोक्यात हातातील वीट मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले.
घटनेनंतर जखमीच्या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.









