मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

हरताळा फाट्यावरील घटना ; गुन्हा दाखल
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरात उभी असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने ३४० लिटर डिझेल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ जुलै रोजी रात्री ८ ते दि. २९ जुलै रोजी रात्री ८.३० वाजण्यापूर्वीच्या कालावधीत हरताळा फाटा येथील हॉटेल आदियोगीसमोर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या एलपीओ-१६१८ (एमएच-१९-सीवाय-२२७७) ट्रकमधून अज्ञात चोरट्याने डिझेल टाकीचे झाकण उघडून ३४० लिटर डिझेल चोरून नेले.चोरीस गेलेल्या डिझेलची अंदाजे किंमत ३४ हजार रुपये आहे.
याप्रकरणी दिनेश भास्कर बाविस्कर (वय २७, व्यवसाय – एकवीरा ट्रॅव्हल्स, रा. सरस्वती नगर, मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अलीकडील काळात महामार्गालगत उभ्या असलेल्या मालवाहू वाहनांमधून इंधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करण्याबरोबरच अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.









