एका कर्मचाऱ्याविरोधात लेखी तक्रार ; अहवाल आल्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार

चाळीसगाव | प्रतिनिधी – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, चाळीसगाव येथे कार्यरत दोन महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाविरोधात दारूच्या नशेत कार्यालयीन वेळेत फोन करून धमक्या देणे, शिवीगाळ करणे व गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारदार दोन महिला वरिष्ठ लिपिक यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्या २३ जुलै २०२६ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, चाळीसगाव येथे रुजू झाल्या आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, २८ जुलै रोजी सायंकाळी कार्यालयीन वेळेत संबंधित कनिष्ठ लिपिकाने प्रथम एका महिला कर्मचाऱ्याला फोन केला. कॉल स्वीकारला न गेल्याने दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला फोन करून धमक्या दिल्या तसेच अशोभनीय वर्तन केले.
तक्रारीनुसार, फोनवरील संभाषणादरम्यान संबंधित कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते. त्याने महिला कर्मचाऱ्यांना नोकरी करू देणार नसल्याची, त्यांना अडचणीत आणण्याची तसेच गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित संभाषणाचे ध्वनिमुद्रणही उपलब्ध असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या घटनेची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांना देण्यात आली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलावण्यात आले असता तो मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच संभाषणादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयीही आक्षेपार्ह व शिवराळ भाषा वापरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे कार्यालयातील वातावरण बिघडले असून महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. दोघींनीही आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा उल्लेख करत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून, तातडीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
”प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्याशी या कथित ऑडिओ क्लिप आणि दोन्ही महिला कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज दाखल केल्याबाबत विचारणा केली असता प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्मा यांनी बोलतांना सांगितले कि, नागेश पाटील या कर्मचाऱ्याचा रीतसर चाळीसगाव उपप्रादेशि अपरिवहन अधिकाऱ्यांकडून अहवाल मागून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी केसरीराजशी बोलतांना सांगितले.









