नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दील या दहशतवादी संघटनेच्या इम्रान नबी या अतिरेक्याला अटक केली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमधून त्याला जेरबंद केले. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील होण्यासाठी इम्रान नबी काही दिवसांपूर्वीच घरातून पळाला होता.
इम्रान नबीने कुटुंबीयांना फोन करुन दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती दिली होती. त्यानतंर त्याचा शोध सुरु होता. इम्रान कोणत्या तरी चकमकीत जखमी झाला होता आणि उपचारांसाठी जंगलटमंडी रुग्णालयात दाखल झाला होता. तिथे सुरक्षा दलाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि काही गोळ्याही जप्त करण्यात आल्या. इम्रान नबी घरातून का आणि कसा पळून गेला आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कसा आला याची आता चौकशी केली जाणार आहे.
मागील काही दिवसात सुरक्षादलाने 27 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे, त्यामुळे हताश झाल्याने दहशतवाद्यांनी आता निरपराधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मागील काही दिवसात 27 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित आहेत.







